
आरोपीला शोधण्यासाठी फिर्यादीला सोबत घेऊन जाण्याचा आचरटपणा करणाऱ्या फौजदार एकनाथ नागरगोजेवर कारवाई करण्याची हिंमत नसलेल्या डरपोक ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी नागरगोजेला मदत का केली नाही म्हणून रत्नपूर पोलिसांच्याच चौकशीचे तुघलकी फर्मान सोडले. पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांची बंद खोलीत चौकशी केली.
वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील संदीप माधव आवारे आणि रवींद्र रखमाजी आवारे यांच्यात संपत्तीवरून भांडण सुरू आहेत. याच वादातून रविंद्र आवारे याच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात संदीप आवारे याच्यावर गुन्हा दाखल असून तो फरार आहे. संदीप हा वेरूळला एका घरात लपून बसला असल्याची टीप मिळाल्यावरून फौजदार एकनाथ नागरगोजे, कॉन्स्टेबल वाल्मिक बनगे हे रवींद्र आवारे आणि त्याच्या गँगला घेऊन रातोरात वेरूळला पोहोचले.
आरोपीच्या शोधासाठी वेरूळला जात असल्याची नोंद त्यांनी वैजापूरच्या स्टेशन डायरीत केली, परंतु रत्नपूर येथे मात्र अशी कोणतीही नोंद करण्यात आली नाही. रात्रीच्या अंधारात हे टोळके एका घरात घुसले. आरडाओरड सुरू झाल्यानंतर तेथून जात असलेले शिक्षक सुरेश बोरसे यांनी ‘तुम्ही कोण आहात’ असे विचारल्यामुळे सटकलेल्या नागरगोजेसह सगळे टोळके बोरसे यांच्यावर तुटून पडले. लाथाबुक्क्यांखाली बोरसे यांना तुडवण्यात आले. यातच त्यांचा मृत्यू झाला. बोरसे यांना अर्धमेल्या अवस्थेत टाकून हे टोळके तेथून पसार झाले. प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून पहाटे एकनाथ नागरगोजे यांनी रत्नपूर पोलीस ठाणे गाठून यासंबंधीची नोंद घेण्यासाठी दबाव आणला. मात्र रत्नपूर पोलिसांनी अशी कोणतीही बेकायदेशीर नोंद घेणार नाही असे खडसावून नागरगोजेला काढून दिले.
कायदेशीर काम करणाऱ्या रत्नपूर पोलिसांना चौकशीचा जाच
वेरूळला जाण्यापूर्वी नोंद का केली नाही, घटना घडल्यानंतर अशी बेकायदेशीर नोंद घेणार नाही अशी कायदेशीर भूमिका घेणारे रत्नपूर पोलीस निष्कारण चौकशीच्या जाचात अडकले आहेत. पोलीस खात्याच्या अब्रुचा जाहीर लिलाव करणाऱ्या फौजदार एकनाथ नागरगोजेला पाठीशी घालण्यासाठी खुद्द पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव हेच वकिली करण्यासाठी समोर आले. नागरगोजेवर कारवाई करण्याची हिंमत न दाखवता कायद्याची बूज राखून काम करणाऱ्या रत्नपूर पोलिसांचीच चौकशी करण्याचे तुघलकी फर्मान जाधवांनी सोडले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी रत्नपूर पोलीस ठाण्याचे एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांची बंद खोलीत चौकशी केली.
फरार आरोपीला अटकपूर्व जामीन
ज्याच्या शोधासाठी वैजापूर पोलिसांनी रात्रीचा दिवस केला तो संदीप आवारे हा वेरूळला त्या घरात होता का? एवढा सगळा खटाटोप करूनही तो सापडला का नाही? जर तो त्या घरात नव्हता तर मग तो कुठे आश्रयाला होता? या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर पोलिसांकडे नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरेश बोसरे यांचा जीव घेणाऱ्या चार आरोपींना काल तात्काळ जामीनही मिळाला, त्याहून कहर म्हणजे ज्याच्यामुळे हे सगळे कांड घडले त्या संदीप आवारेलाही अटकपूर्व जामीन मिळाला!
बोरसे मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे
‘तुम्ही कोण आहात’ असा साधा प्रश्न विचारला म्हणून जिवाची किंमत मोजावी लागलेल्या सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांनी रत्नपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजसह इतर माहिती घेतली. त्यानंतर राजपूत यांनी वेरूळ येथे जाऊन बोरसे कुटुंबाचीही भेट घेतली. या प्रकरणात मंगळवारी प्रत्यक्षदर्शीचा जबाब ऑनलाईन नोंदवण्यात येणार आहे.
सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
वेरुळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही आमदार दानवे यांनी केला आहे. सुरेश बोरसे यांना वाहनात का नेण्यात आले, त्यांना मारहाण का करण्यात आली आणि कुटुंबीयांशी गैरवर्तन का करण्यात आले, या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक असल्याचे आमदार दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.





























































