उड्डाण करताच विमानातून स्फोटासारखा आवाज, इंजिनमधून ठिणग्या; श्रीलंकेच्या हवाईहद्दीत नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेच्या हवाईहद्दीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना उघडकीस आली आहे. कोलंबोहून सिडनीकडे उड्डाण घेतल्यानंतर विमानावर वीज पडली आणि 233 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. वीज पडताच विमानातून स्फोटासारखा आवाज आला आणि एका इंजिनमधून ठिणग्या दिसू लागल्या. यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. सुरक्षेच्या कारणास्तव विमान माघारी वळवून कोलंबो विमानतळावर सुखरुप उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप आहेत.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शुक्रवारी मध्यरात्री 12.05 वाजता विमान सिडनीकडे रवाना झाले. विमानात 207 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर होते. श्रीलंकेत पावसाळी वातावरण असल्याने उड्डाण घेतल्यानंतर विमानावर वीज पडली. यामुळे स्फोटासारखा आवाज आला. एका इंजिनमधून ठिणग्याही निघताना दिसल्या आणि प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकला. प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

विमानातील क्रू मेंबर्सने प्रवाशांना शांत करत घटनेची माहिती दिली. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव वैमानिकाने विमान माघारी वळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमान बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. विमान उतरताच प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमान सुरक्षा तपासणीसाठी नेण्यात आले. प्रवाशांना पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात उड्डाणादरम्यान विमानाजवळ ठिणग्या उडताना दिसत आहेत.