‘होय सर, होय सर…’ म्हणत मोदी सरकार झुकले; 3 खलाशांच्या मृत्यूप्रकरणी अमेरिकेने हिंदुस्थानला दम भरल्यानंतर काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओमानच्या किनारपट्टीजवळ किनारपट्टीजवळ एका व्यापारी जहाजावर अमेरिकन नौदलाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 3 निष्पाप हिंदुस्थानी खलाशांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांचा निषेध करायला गेलेले मोदी सरकार तोंडावर आपटले आहे. हिंदुस्थानच्या निषेधाची दखल न घेता उलट अमेरिकेने हिंदुस्थानला दम भरला. यामुळे राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने केंद्र सरकारच्या बोटचेप्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत मोदी सरकार आणि परराष्ट्र मंत्री आहेत. 3 निष्पाप हिंदुस्थानी नागरिकांचा बळी घेतल्यानंतरही अमेरिकेच्या भाषेत कोणतीही संवेदना, पश्चाताप किंवा माफी नाही. उलट अमेरिकेकडून हिंदुस्थानलाच धमकावले जात आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांनी हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्र्यांना दम देत अमेरिकन सैन्याच्या आदेशांचे पालन करावे लागेल आणि आदेश न पाळल्यास ते खपवून घेतले जाणार नाही अशी भाषा वापरली आहे.

ज्या देशाने आपल्या नागरिकांची हत्या केली, त्यांच्याकडून माफी मागण्याऐवजी मोदी सरकारचे परराष्ट्र मंत्री फोनवर केवळ होय सर… होय सर.. करत ऐकून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे तडजोड झाल्यामुळेच आज अमेरिकेची एवढी हिंमत वाढली असून देशाला याचा फटका बसावा लागत आहे, अशी टीका काँग्रेसने केली.

दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार डॉ. शशी थरूर यांनीही अमेरिकेच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना टॅग करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेरिकेच्या अधिकृत पत्रकात निष्पाप हिंदुस्थानी नागरिकांच्या मृत्यूबद्दल कोणताही शोक किंवा खेद व्यक्त करण्यात आलेला नाही. एक मित्र आणि धोरणात्मक भागीदार देश इतका असंवेदनशील कसा असू शकतो? असा सवाल थरूर यांनी केला.

जर ते व्यापारी जहाज आदेश पाळत नव्हते, तर त्यांना थांबवण्यासाठी क्षेपणास्त्र डागण्याऐवजी जहाजाचे इंजिन किंवा सुकाणू निकामी करून ते थांबवता आले नसते का? थेट नागरी क्रू मेंबर्सचा जीव घेण्याची काय गरज होती? सध्या या समुद्रातून प्रवास करणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यापारी जहाजावर हिंदुस्थानी खलाशी तैनात आहेत. मग आता या सर्वांना अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचे सोपे लक्ष्य मानले जाणार का? असा सवालही त्यांनी केला.

अमेरिकेने हिंदुस्थानला दम भरला, आमचे आदेश पाळावेच लागतील! मोदी सरकारची ट्रम्प प्रशासनाकडून गोची