
एका भयंकर घटनेने आज रायगड जिल्हा हादरून गेला. मासे मारण्याची गोळी कोल्ड्रिंकमध्ये टाकून एका मातेने आपल्या चार मुलांसह आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. माणगावमधील या थरारक घटनेत आई व दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. कौटुंबिक वादातून आशा जाधव यांनी हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
माणगाव तालुक्यात खरवली आदिवासी वाडी आहे. या आदिवासी वाडीत धर्मा जाधव आणि त्याची पत्नी आशा जाधव कुटुंबासह राहतात. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आशा जाधव आणि तिची चार मुले घरात बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आशा जाधव यांच्यासह मुलगा रवी (८), मुली दुर्वा (७), नंदिनी (४) आणि राजश्री (४) यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी आशा जाधव, दुर्वा जाधव, नंदिनी जाधव यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. माणगाव येथील प्रसिद्ध बालरोग व नवजात शिशुतज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी राजश्री आणि रवी या अत्यवस्थ मुलांची तपासणी करून त्यांना मुंबई येथील रुग्णालयात हलवले.
आशा हिच्या घरात रिकामी कोल्ड्रिंकची बाटली पडली होती आणि त्याला विशिष्ट दुर्गंधी येत होती. मासे मारण्याची विषारी गोळी कोल्ड्रिंकमध्ये टाकून तिने ते आधी मुलांना दिले आणि नंतर स्वतः प्यायल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ही घटना कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यामुळे घडल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.
नवरा बेपत्ता, शोध सुरू
आशा जाधव हिने मुलांना विष पाजून स्वतः विष प्यायले. तेव्हा तिचा नवरा धर्मा घरात नव्हता. जो जिथे रोजंदारीला जातो तिथेही पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तो कामावर आला नसल्याचे समजले. त्यानंतर त्याचा ठिकठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही. धर्मा ताब्यात आल्यानंतरच चौकशीअंती आशाने स्वतः विष पिऊन मुलांना का पाजले याचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.


























































