
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असून, पर्जन्यमानात घट होण्याची शक्यताही वर्तविली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राज्यातील विविध धरणे, जलाशय आणि जलस्त्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करून सुरू असलेली पाण्याची आवर्तन तत्काळ बंद करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
यासंदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकात जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या आधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील धरणे व जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्यावा. अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या पाण्याचा वापर इतर कोणत्याही कारणांसाठी करू नये. 31 ऑगस्टपर्यंत आरक्षित करण्यात आलेला पाणीसाठा जपून वापरण्याबाबतही जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, पाणीपुरवठा विभाग यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून परिस्थितीचा नियमित आढावा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.



























































