
बळीराजाला लुटणाऱ्या कृषी केंद्र चालकांचा आणखी एक कारनामे मंगळवेढ्यात उघडकीस आल आहे. पाठखळ येथील एका कृषी केंद्रातून खताच्या नावाखाली चक्क मिठाची विक्री करून शेतकरी आणि शासनाची तब्बल 10 लाख 46 हजार 780 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सतीश मनोहर भोसले (रा. पाठखळ) आणि रविराज शंकर कणसे (रा. सातारा) या दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाठखळ येथील ‘मे. प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्र’ आणि त्याच्या गोदामावर जिल्हा कृषी अधिकारी व मंगळवेढ्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने संयुक्त छापा टाकला. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान या केंद्रात रासायनिक खताच्या नावाखाली चक्क मिठाची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
याप्रकरणी हरिदास बोंगे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 8 जून रोजी सायंकाळी हा साठा जप्त करण्यात आला असून, आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मोठ्या रॅकेटचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करीत आहेत. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची अशी क्रूर थट्टा करणाऱ्या या टोळीमुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खत विक्रीची बिले गायब!
कृषी अधिकाऱ्यांनी या संशयास्पद खत विक्रीबाबत संबंधित दुकानदारांकडे बिलांची मागणी केली. मात्र, भेसळयुक्त खतांचा हा काळाबाजार असल्यामुळे आरोपींना बिले सादर करता आली नाहीत. आरोपींनी बनावट आणि भेसळयुक्त रासायनिक खते तयार करून शासनाचे नियम धाब्यावर बसवले आणि शेतकऱयांची उघड फसवणूक केली.
























































