Iran US War – इराणसोबत आजच शांतता करार होणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, आखातातील घडामोडींकडे जगाचं लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या चार महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध संपवण्यासाठीचा बहुप्रतिक्षित शांतता करार अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळत आहेत. या ऐतिहासिक करारावर रविवारीच स्वाक्षरी होऊ शकते. हा करार लागू होताच जागतिक व्यापारी वाहतुकीसाठी अत्यंत संवेदनशील असलेली होर्मुझची सामुद्रधुनी सर्व देशांच्या जहाजांसाठी तातडीने खुली केली जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. त्यामुळे आखातातील घडामोडींवर अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.

इराणसोबतचे युद्ध संपवण्याच्या करारावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. या करारानंतर इराणचा संवर्धित युरेनियमचा संपूर्ण साठा अखेर अमेरिकेच्या ताब्यात येईल. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, असे ट्रम्प म्हणाले.

दुसरीकडे इराणने अमेरिकेशी करार जवळ आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, मात्र ट्रम्प यांनी सांगितलेली रविवारची डेडलाईन फेटाळली आहे. घाईघाईत रविवारीच स्वाक्षरी होणार नाही. पण येत्या काही दिवसांत या करारावर स्वाक्षरी होऊ शकते, अशी अधिकृत भूमिका इराणने मांडली आहे.

शांतता करार करण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शनिवारी इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर हवाई हल्ले केले. यावर इराणने कडक भूमिका घेतली असून, अमेरिकेसोबत होणारा कोणताही युद्धविराम केवळ इराणपुरता मर्यादित नसेल. इस्रायलने लेबनॉनमधील आपले लष्करी ऑपरेशन तात्काळ थांबवावे, तरच हा करार पूर्ण होईल,” अशी अट घातली आहे.