
आईशिवाय या जगात दुसरं कोणतं मोठं दैवत नाही. माणसाला यश, पैसा, प्रसिद्धी कितीही मिळाली, तरी आईच्या एका मायेच्या आवाजापुढे हे सगळं फिकं पडतं, याचाच प्रत्यय हिंदुस्थान विरुद्ध अफगाणिस्तान सामना संपल्यानंतर आता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारा स्टार खेळाडू जेव्हा जगासमोर बोलताना अचानक लहान बाळ होऊन आईशी संवाद साधतो, तेव्हा त्याचा साधेपणा मन जिंकून जातो.
धर्मशाळा येथे झालेल्या पहिली एक दिवसीय लढतीत हिंदुस्थानने अफगाणिस्तानला 7 विकेट्स राखून मात दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 25 षटकांचा खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 194 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने दिलेले आव्हान हिंदुस्थानने कर्णधार शुभमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सहज पूर्ण केले. हा सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर आई आणि मुलाच्या नात्यातील गोडवा दाखवणारी घटना घडली.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. पत्रकार परिषद सुरू असताना अचानक त्याला आईचा फोन आला. क्षणाचाही विचार न करता नितीशने फोन उचलला आणि अत्यंत प्रेमाने व नम्रपणे म्हणाला, “मम्मी, 5 मिनिटांत परत कॉल करतो.” आईशी संवाद झाल्यानंतर त्याने तिथे उपस्थित सर्व पत्रकारांची मोठ्या आदराने माफी मागितली आणि पुन्हा प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून बीसीसीआयने याचा व्हिडीओही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
The post-match presser can wait but a call from Mom simply cannot 😊#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @NKReddy07 pic.twitter.com/23OUBNZvYH
— BCCI (@BCCI) June 13, 2026
दरम्यान, कॅमेऱ्यात कैद झालेला हा भावुक आणि साधेपणाचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिंदुस्थानी संघाच्या विजयानंतर समोर आलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी नितीश रेड्डीचे तोंडभरून कौतुक केले आहे. नितीश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असला, तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. त्याचे आपल्या कुटुंबावरील आणि आईवरील प्रेम स्पष्ट दिसते, अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.
नितीशची चमकदार कामगिरी
नितीश कुमार रेड्डीने पहिल्या एक दिवसीय लढतीत आपल्या खेळानेही प्रभावित केले. त्याने अचूक गोलंदाजी करत 4 षटकांमध्ये 31 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले. तर धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिलने नाबाद 84 धावांची खेळी साकारली. या उत्कृष्ट खेळीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यातून वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि फिरकीपटू हर्ष दुबे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या दोन्ही नवोदित गोलंदाजांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत हिंदुस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


























































