
हिंदुस्थानी तरुणांवर लंडनमध्ये चाकू हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एका तरूणाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरभेज सिंग (26) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र चौकशीनंतर सहा जणांना सोडून देण्यात आले तर एकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम लंडनमधील साउथहॉल येथे हा हल्ला झाला. यात हिंदुस्थानी वंशाच्या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य 30 वर्षीय तरुण जखमी असल्याचे मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
प्रत्यक्षदर्शी आणि ज्यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे अशा लोकांनी पुढे येऊन तपासात सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.
या घटनेनंतर, मृतदेह मायदेशी नेणे, कागदपत्रांची पूर्तता, वाहतूक, अंत्यसंस्काराची व्यवस्था आणि इतर संबंधित खर्चासाठी 16,000 युरोची आवश्यकता आहे. यासाठी ‘गो-फंड-मी’ (GoFundMe) मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 11,114 युरो जमा झाले आहेत.


























































