
शुभमन गिलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने अफगाणिस्तानवर पहिल्या वनडे सामन्यात सात विकेट्स राखत विजय साकारला. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा खेळवण्यात आला. रहमनुल्लाह गुरबाझच्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 194 धावांपर्यंत मजल मारली. पण हिंदुस्थाननने सात विकेट्स आणि 13 चेंडू राखून विजय मिळवला.
गुरबाझ भारताच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने फक्त 51 चेंडूंत 8 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर 102 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. गुरबाझ बाद झाल्यावर संघाची धावगती मंदावली आणि त्यांना दोनशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही.
195 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने झोकात सुरुवात केली होती; पण शुभमन गिलबरोबर त्याचा विसंवाद झाला आणि रोहित धावचीत होत तंबूत परतला. त्याला 16 धावा करता आल्या. त्यानंतर गिलने संघाची जबाबदारी सांभाळली आणि संघाला विजयापर्यंत पर्यंत पोहोचवले. गिलने 66 चेंडूंत 11 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 84 धावांची खेळी साकारली. लोकेश राहुलने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करत फक्त 19 चेंडूंत नाबाद 39 धावांची झकास खेळी साकारली.
























































