वाई तालुक्याची कन्या भाग्यश्री थोरवे बनली फौजदार, नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर शेतकरी कुटुंबातील एका कन्येने यशाचे शिखर गाठत वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे. व्याहळी कॉलनी येथील भाग्यश्री विद्या विजय थोरवे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीचे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून वाई तालुक्याचा गौरव वाढवला आहे.

महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पार पडलेल्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्यांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची घोषणा करण्यात आली. या दीक्षांत संचलन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते उपस्थित होते. विशेष म्हणजे, भाग्यश्री थोरवे यांनी वाई तालुक्यातील पश्चिम भागाच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी बनण्याचा मान मिळवला असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भाग्यश्री यांचे वडील विजय थोरवे व आई विद्या थोरवे हे दोघेही शेतकरी आहेत. अत्यंत साध्या परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, व्याहळी कॉलनी येथे, माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे, तर बी.कॉम. पदवी किसन वीर महाविद्यालय, वाई येथून पूर्ण झाली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.कॉम. ही पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली. स्पर्धा परीक्षांमध्येही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवत एमपीएससी 2022 मधून पोलीस उपनिरीक्षक तसेच महसूल सहायक 2023 पदासाठी निवड मिळवली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भावना व्यक्त करताना भाग्यश्री थोरवे म्हणाल्या, शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आई-वडिलांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळाले. पोलीस अधिकारी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच माझे ध्येय राहणार आहे.