
>> वैश्विक
या वर्षी केरळमध्येच पाऊस उशिरा आला. ‘एल निनो’चे प्रताप जाणवायला लागले. उन्हाची काहिली कमालीची वाढली. त्यातच पुन्हा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर टाकणारा युद्धाचा आगडोंब मध्यपूर्वेत उफाळून आला. आता आपल्या ‘जनक’ ताऱ्यानेही, म्हणजे सूर्यानेही सध्या उग्र रूप धारण केलंय. पृथ्वीवर ‘एल निनो’चा उल्हास आणि त्यात सौर वादळांचा फाल्गुन मास असा सगळा ‘संतप्त’ काळ तर मोठा कठीण आला आहे. अर्थात विराट निसर्गाच्या लहरीपुढे कुणाचंच काही चालणार नाही. पृथ्वीवर गमजा मारल्या तरी त्या अंतराळात टिकणार नाहीत. निर्हेतुक विराटाकार विश्वासाठी पृथ्वीवरच्या सत्ता नि मत्ता खिजगणतीतही नसतात, असं वाटण्याचं कारणही तसंच आहे.
गेल्या 8 तारखेला सूर्यावरच्या वादळांच्या आवर्तनाने उग्र स्वरूप धारण केले. प्रचंड नैसर्गिक अणुभट्टी गाभ्यात बाळगणाऱ्या सूर्यावर क्षणोक्षणी हायड्रोजनचं रूपांतर हिलियम वायूत होत असतं. त्यातून अफाट उर्जा (नि प्रकाशही) निर्माण होतो. त्याच ऊर्जेवर पृथ्वीवरचं आपलं ‘जीवन’ फुलतं, परंतु जेव्हा ती ऊर्जा साखळी अचानक उसळी घेते तेव्हा सूर्यावर महाचक्रवात निर्माण होतात. ते अग्निवादळ किंवा अग्नितांडवच असतं.
सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सियस इतकं आहे, तर गाभ्यामधलं दीड कोटी! इथे आपण पारा चाळीस-पंचेचाळीस अंश सेल्सियसपर्यंत गेला तर हैराण होतो. दीड कोटी किंवा अगदी कमी म्हणजे तीन ते सहा हजार अंश सेल्सियस म्हणजे किती याची केवळ कल्पना केली तरी दाहक वाटेल.
म्हणूनच ‘सूर्यावर’ कोणतंही यान ‘उतरवता’ येत नाही. तो ‘तेजोनिधी’ आहेच, परंतु केवळ लोहगोल नसून अनेक धातूंची निर्मिती करणारा तप्त अग्निमय वायुगोल आहे. त्यावर नेमकं काय चाललंय आणि त्याचा पृथ्वीवर कोणता परिणाम होणार आहे, हे आता आधुनिक विज्ञानाला जाणता येतं. मात्र त्यात ‘बदल’ करता येत नाही. निसर्ग आहे तसा जाणून त्याच्याशी जुळवून घेण्याचा उपजत शहाणपणा सर्वच सजीवांमध्ये असल्याने ते पृथ्वीवर तग धरून आहेत. माणूस ‘प्रगती’च्या नावाखाली निसर्गाची साथ सोडून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करेल तसतसे त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील याची चुणूक दिसतेच आहे.
हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे दर अकरा किंवा एकशे एकवीस वगैरे वर्षचक्रांनी सूर्यावर सौर वादळे येतात तो काळ सध्या सुरू असून गेल्या 8-9 जून रोजी सौर वादळाने इतकं उग्र रूप धारण केलं की, ‘नासा’ने पृथ्वीवासीयांना संदेशवहनात व्यत्यय येऊ शकतो, असा इशारा दिला. सूर्याची ‘एम-1.18’ नावाची सौरज्वाला एखाद्या आगीनकमानीसारखी सौरपृष्ठावर उंचच उंच उफाळली.
सूर्यावर अशी वादळं झाली की, उसळलेल्या, लहलहत्या सौरज्वाला सूर्यापासून दूर अंतराळात फेकल्या जातात. सेकंदात 1400 किलोमीटर या वेगाने त्या सर्वत्र पसरल्या तर त्यातील भारित कण किंवा ‘चार्ज्ड पार्टिकल्स’ पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशांभोवती असलेल्या चुंबकीय क्षेत्राला धडक देतात. या टकरीचा परिणाम म्हणून उत्तर आणि दक्षिण ध्रुव परिसरात अरोरा किंवा विविधरंगी प्रकाश दिसू लागतो. हे दृश्य मनोहारी असतं.
सौरज्वालांची तीव्रता ‘ऑक्टिव्हिटी’ जेवढी अधिक तेवढी अरोरांची रंगीत आरास जास्त सुंदर. 8 जूनच्या महासौर वादळातून निर्माण झालेल्या ज्वाला आणि त्यातून उत्पन्न झालेले चार्ज्ड पार्टिकल्स यांचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी संयोग होऊन या वेळी दूरवर म्हणजे अगदी आपल्या लडाखपर्यंत अरोरा दिसण्याचं भाकित केलं गेलं. यापूर्वीही लडाखमधून अशा प्रकारचे ‘अरोरा’ दिसले आहेत.
सूर्याच्या अतितप्त पृष्ठभागातून सेकंदाला 400 ते 800 किलोमीटर वेगाने विद्युतभारित कण सर्वत्र प्रसारित होत असतात. उग्र सौर वादळांनी त्यात भर पडते. हा ‘सौरवात’ (सोलारविण्ड) जेव्हा पृथ्वीच्या ध्रुवीय भागातील चुंबकीय क्षेत्रात प्रवेश करतो तेव्हा विविध रंगांचा पटच नजरेला जाणवतो. हा विद्युतभारित रेणूंचा खेळ असतो. तोच उग्र झाला तर उपग्रहीय संदेशवहनात अडथळा आणून सर्व इलेक्ट्रॉनिक व्यवहार ठप्प करू शकतो. 8 जूनला अशाच सौर वादळाने तडाखा दिला. त्याचे नाव ‘जी-3 तीक्र सौर वादळ’ असं होतं. त्याने फार उत्पात घडवला नाही हे पृथ्वीवासीयांचे सुदैव! 9 जूनच्या सायंकाळी मात्र आकाशात गुरू-शुक्र खूपच जवळ आल्याने झालेली मनोहारी युती पाहायला मिळाली!



























































