
मुंबई – पुणे एक्प्रेस वेवरील मिसिंग लिंकवर आज तीन गाडय़ांचा विचित्र अपघात घडला. मिसिंग लिंकच्या ब्रिजवर आल्यानंतर फॉर्च्यूनर कारचालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे या गाडीवर दोन कार धडकल्या. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. अपघातामुळे मिसिंग लिंकवरील गाडय़ांचा वेग मात्र काही काळ मंदावला होता.
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरून पुण्याच्या दिशेने जात असलेली फॉर्च्यूनर कार (एमएच-5, सीएच-3512) आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मिसिंग लिंकवरील ब्रिजवर आली. त्यावेळी पुढे चाललेल्या कार चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे फॉर्च्यूनर चालकाने आपली कार तिसऱ्या लेनवर घेतल्याने पाठीमागून भरधाव वेगात येणारी वेरणा कार (एपी-39, एलडब्ल्यू-9979) या गाडीवर जोरदार आदळली. वेरणा कारच्या मागे असलेली एक्सयूव्ही कारवरीलचालकांचे नियंत्रण सुटले आणि ती कारही या दोन्ही अपघातग्रस्त गाडय़ांवर येऊन आदळली. अपघातानंतर तिन्ही कारमधील एअरबॅग उघडल्याने कुणीही जखम झाले नाही. मात्र या अपघातात तिन्ही कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस तत्काळ अपघातस्थळी दाखलझाले आणि त्यांनी अपघातग्रस्त कार व्रेनच्या सहाय्याने बाजूला घेतल्या. त्यानंतर मिसिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली.
चौकमध्ये सहा वाहने एकमेकांवर आदळली
चौकजवळील वावंढळ परिसरात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. ही सर्व वाहने एकमेकांवर आदळली. अॅक्सेल तुटल्याने एक टेम्पो रस्तात उभा होता. चालक मागून येणाऱ्या वाहनांना सावधगिरीचा इशारा देत असताना भरधाव कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने एसटी बस आणि टेम्पोला धडक दिली. त्यामुळे पुढे चाललेली मारुती कार, छोटा हत्ती टेम्पोसह अन्य वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.



























































