
‘जय गंगे भागीरथी’, ‘नारायणा रमारमणा’ अशी लोकप्रिय नाटय़पदे गाणारे ज्येष्ठ गायक-नट प्रसाद सावकार यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी पणजी येथील टोका करंजाळे परिसरातील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांच्या पार्थिवावर उद्या, 18 जूनला पणजी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
प्रसाद सावकार यांचा जन्म गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध सावकार घराण्यात बडोदा येथे झाला. त्यांचे वडील रघुवीर सावकार हे मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक-नट होते. वडिलांकडूनच त्यांनी गायन आणि अभिनयाचे धडे घेतले. बालकलाकार म्हणून ‘जिंजीहून सुटका’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. ‘संशयकल्लोळ’ या नाटकात एकाच वेळी चार भूमिका साकारून त्यांनी विक्रमही केला होता. 1960 ते 1972 या काळात मराठी संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनात प्रसाद सावकार यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘तो राजहंस एक’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या.
भारदस्त आवाज, प्रभावी अभिनय
‘जय गंगे भागीरथी’, ‘सावन घन गरजे’, ‘रतिहून सुंदर’, ‘भरे मनात सुंदरा’ आणि ‘नारायणा रमारमणा’ यांसारखी त्यांनी गायिलेली नाटय़पदे आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. त्यांचा भारदस्त आवाज, शास्त्राrय संगीतावरील प्रभुत्व आणि प्रभावी अभिनय यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. नाटय़क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय बालगंधर्व सुवर्णपदक, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठत सन्मान त्यांना प्राप्त झाले.

























































