
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) तर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी घेण्यात आलेल्या पाच वर्षीय विधी (एलएलबी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पुण्याची स्पंदना वत्स ही 100 पर्सेंटाइल गुण मिळवत राज्यातून प्रथम आली आहे. या परीक्षेत केवळ दोनच विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.
लॉ सीईटी परीक्षा 8 मे 2026 रोजी दोन सत्रांमध्ये सीबीटी पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 37 हजार 140 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 29 हजार 288 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात 13 हजार 529 विद्यार्थी, 15 हजार 757 विद्यार्थिनी आणि दोन तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता. विविध प्रवर्गांतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ठाण्याचा नीलेश तायडे (एससी) 99.90, नागपूरची धनश्री सुर्पम (एसटी) 99.67, पुण्याचा श्रेयस शिंदे (ओबीसी) 99.87 यांच्यासह इतर काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले. सीईटी कक्षाने निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिला असून या अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) लवकरच सुरू होणार आहे.



























































