‘मराठी’साठी शिवसेना आक्रमक, पश्चिम रेल्वे प्रशासनाला दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषा डावलून इंग्रजी भाषेत मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचा नामफलक लावणाऱ्या पश्चिम रेल्वे प्रशासनाला बुधवारी शिवसेनेने जोरदार दणका दिला. केवळ इंग्रजी भाषेचा वापर केलेला नामफलक तत्काळ बदलून त्यावर प्राधान्याने मराठी भाषेत ‘मरीन लाईन्स’ हे नाव ठळकपणे नमूद करा, अन्यथा मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी उग्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने देण्यात आला. त्यामुळे हादरलेल्या रेल्वे प्रशासनाने अवघ्या दोन तासांत रेल्वे स्थानकाचा इंग्रजीतील नामफलक झाकला.

‘रेल्वेला मराठीचे वावडे’ असल्याचे छायाचित्र दै. ‘सामना’ने बुधवारी प्रसिद्ध केले. त्याची गंभीर नोंद शिवसेना दक्षिण मुंबई विभागाच्या वतीने घेण्यात आली आणि मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या इंग्रजी भाषेतील नामफलकाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, विधानसभा प्रमुख विकास मयेकर, शिवाजी रहाणे, सुनील कदम, किरण बाळसराफ, बाजीराव मालुसरे, शाखाप्रमुख बाळा आहिरेकर, मंगेश सावंत, प्रभाकर पाष्टे, विजय पवार, कृष्णा कांबळे, वैभव मयेकर, संतोष वीर, राजेश हजारे, रोहित महाडिक तसेच महिला आघाडीच्या सुरेखा उबाळे, वर्षा साबळे, मीना आंधळे, रिया चेंदवणकर यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी झाले. मराठी भाषेचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने इंग्रजी नामफलक हटवून तेथे मराठी भाषेत ठळकपणे ‘मरीन लाईन्स’ असा उल्लेख असलेला फलक लावा, अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यासंदर्भात निवेदन दिल्यानंतर दोन तासांतच इंग्रजी भाषेतील नामफलक झाकण्यात आला. शिवसेनेच्या दणक्याने रेल्वे प्रशासन चांगलेच हादरले.

मराठी भाषेचा अनादर खपवून घेणार नाही!

महाराष्ट्राच्या राजधानीत, मराठी माणसांच्या मुंबईत मराठी भाषेला डावलण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. मराठी भाषेचा अनादर अजिबात खपवून घेणार नाही. कोणत्याही प्रशासनाकडून मराठीला डावलण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना तो प्रयत्न हाणून पाडेल. मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी शिवसेनेचा लढा यापुढेही सुरूच राहणार, अशी आक्रमक भूमिका शिवसेना विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी मांडली.