पुनर्विकास आणि ईस्टर्न फ्री वेसाठी 926 झाडांवर कुऱ्हाड, वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या गोष्टी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून प्रकल्पाच्या नावाखाली काही दिवसांतच 926 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. यामध्ये गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगरमधील ‘म्हाडा’च्या पुनर्विकास प्रकल्पासाठी 220 तर ईस्टर्न फ्री वेच्या विस्तारीकरणासाठी 706 झाडे तोडली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव आगामी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत.

गोरेगावमध्ये म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पात 89 झाडे तोडली जाणार असून 131 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत, तर घाटकोपरमधील छेडानगर ते ठाण्यातील आनंदनगर प्रस्तावित ईस्टर्न फ्री वेच्या विस्तारामध्ये या ठिकाणी असलेल्या 1655 झाडांपैकी 706 झाडे प्रकल्पाच्या आड येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यातील 320 झाडे तोडण्यात येणार असून 386 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव सत्ताधारी वृक्ष प्राधिकणामध्ये बहुमताने मंजूर करण्याचीच शक्यता आहे. एकीकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला असताना सुमारे एक हजार झाडे तोडण्याचे प्रस्ताव आल्याने सत्ताधाऱयांची भूमिका दुटप्पी असल्याचे बोलले जात आहे.

नियम काय सांगतो…

मुंबईत कोणत्याही प्रकल्पासाठी, पुनर्विकासासाठी झाडे तोडायची असल्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असते. यानुसार प्रकल्पासाठी कापल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात पाच पट झाडे लावणे अनिवार्य आहे.

कत्तल मुंबईत, बदल्यात झाडे पालघर, भिवंडीत

मोतीलाल नगरमधील पुनर्विकासात तोडल्या जाणाऱया झाडांच्या बदल्यात पालघर जिह्यातील चहाडे गावात 4006 झाडे लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर ईस्टर्न फ्री वेच्या विस्तारीकरणात हटवल्या जाणाऱया झाडांच्या बदल्यात भिवंडी तालुक्यातील करीवली गावात 7666 झाडे लावली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत झाडे तोडली जात असताना बदल्यात लावण्यात येणारी झाडे मुंबईतच लावली पाहिजेत, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.