
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर कोलकात्यात ऐतिहासिक रेड रोडवर कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत, मात्र कार्यक्रमासाठी वाहतूक वळवण्यात आली आहे. अवघ्या तासाभराच्या कार्यक्रमासाठी रेड रोड आणि त्याला जोडलेल्या इतर रस्त्यांवरील वाहतूक सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर बुधवारी सुनावणी झाली.
कोलकाता उच्च न्यायालयात अॅडव्होकेट असोसिएशनने याचिका करून ट्रफिक पोलिसांच्या आदेशावर प्रश्न उपस्थित करण्यात केले आहेत. न्यायालयात वकिलांनी सांगितले की, रविवारी फक्त एक तास 15 मिनिटांसाठी योग कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पण प्रशासनाने या रेड रोड कार्यक्रमासाठी 7 दिवस रस्ता पूर्ण बंद केला आहे.
वाहतुकीसंदर्भात जारी केलेल्या आदेशाचा दाखला देत वकिलांनी म्हटलं की, या निर्णयामुळे सामान्य जनतेला वाहतूककोंडीचा प्रचंड त्रास होणार आहे. यात कोर्टाने लक्ष घालावे अशी विनंती वकिलांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांना वाहतुकीबाबत आदेश जारी करावा, रेड रोड आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर पायी चालणाऱ्या आणि वाहनधारकांसाठी कोणताही अडथळा येऊ नये अशी व्यवस्था करण्याची मागणी याचिकेत केली.
कोलकात्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा विश्वविक्रम केला जाणार आहे. योगदिनी मोठ्या प्रमाणावर राज्य आणि पेंद्र सरकारने भव्य अशा कार्यक्रमाची तयारी केली आहे. गंगा नदीत एकाच वेळी 500 बोटींमध्ये योगासनाचे आयोजन केले जाणार आहे.



























































