
सायबर गुन्हेगारांना रोखण्याबरोबर नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्यास त्यांना झटपट मदत मिळावी याकरिता दोन नवीन पोर्टल सायबर पोलिसांनी सुरू केले आहेत. सायबर गुन्ह्यांत चुकून बँक खाते गोठले गेले किंवा सायबर फसवणुकीत गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता ही दोन पोर्टल नागरिकांना मदत करणार असल्याचे पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी सांगितले.
सायबर गुह्याच्या तपासादरम्यान बऱयाचदा एखाद्याचे बँक खाते संशयावरून किंवा तांत्रिक कारणांमुळे गोठवले जाते. मग हे खाते पूर्ववत करण्यासाठी खातेदाराला बँक, पोलिसांकडे खेटे माराव्या लागतात. त्यातच तपास पूर्ण होईपर्यंत खाते हाताळता येत नसल्याने मनस्ताप होतो. यावर झटपट तोडगा म्हणून जीआरएम (Grievance Redressal Mechanism) हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. एक लेखी तक्रार बँकेकडे केल्यावर या पोर्टलच्या माध्यमातून खातेदार, बँक अधिकारी आणि तपास अधिकारी जोडले जातात. गुन्ह्यात चुकून खाते गोठल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ खात्यावरील व्यवहार सुरू केले जातात.
सायबर गुन्ह्यामध्ये आर्थिक फसवणूक झाल्यास गोल्डन अव्हरमध्ये मदत मागितल्यास फसवणुकीची रक्कम वाचवली जाते. मात्र ही रक्कम परत मिळविण्याकरिता पुन्हा तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधितांची रक्कम झटपट परत मिळविण्यासाठी ‘एमआरएम’ (Money Restoration Module) हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सायबर गुह्यात फसवणूक झाल्यास या दोन्ही पोर्टलचा वापर करावा असे आवाहन उपायुक्त बनसोडे यांनी केले.



























































