जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांना 50 टक्के घरपट्टी माफ, चिंध्रण ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांना घरपट्टीमध्ये 50 टक्के सूट देण्याचा निर्णय पनवेल तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीने घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमांचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. पहिल्या दिवशी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळा चिंध्रण येथे इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. मिरवणूक काढून, फुलांचा वर्षाव करत आणि शुभ पावलांचे ठसे घेऊन या विद्यार्थ्यांचा ज्ञानमंदिरात प्रवेश सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. याप्रसंगी चिंध्रण गावचे सरपंच एकनाथ पाटील,
उपसरपंच मनोज कुंभारकर, सदस्य जीवन पाडेकर, ग्रामविकास अधिकारी ईश्वर पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जागृती पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टीमध्ये 50 टक्के सवलत देण्याचे सरपंच एकनाथ पाटील यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले आहे.