
ठाकुर्ली-चोळेगाव डायलिसिस सेंटरचा कारभार तंत्रज्ञांच्या हाती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेंटरमध्ये डॉक्टरच नसल्याचा भंडाफोड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने केला आहे. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या डायलिसिस केंद्रामध्ये 24 तास डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी महिला शहर संघटक अक्षरा पटेल यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सादिया पिंजारी यांच्याकडे केली आहे.
ठाकुर्ली-चोळेगाव परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डायलिसिस केंद्र आहे. या केंद्रामध्ये नियमित डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टर नसल्याने केवळ तंत्रज्ञांच्या माध्यामातून डायलिसिस सेवा दिली जात आहे. डायलिसिस सुरू असताना एखाद्या रुग्णाची प्रकृती अचानक बिघडली, हृदयविकाराचा झटका आला रक्तदाबात चढ-उतार झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध होत नाहीत. डॉक्टर येईपर्यंत रुग्णांन ताटकळत थांबावे लागते. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याविरोधात शिवसेनेने आवाज उठवला आहे.
कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध नाही
डायलिसिस केंद्रामध्ये कायमस्वरूपी रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे तीन वर्षांपूर्वी एका महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. याची महापालिकेने तातडीने दखल घेऊन सर्व डायलिसिस केंद्रांमध्ये 24 तास उपलब्ध राहतील अशा पात्र डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी महिला शहर संघटक अक्षरा पटेल, उपशहरप्रमुख जगदीश जुलूम, प्रमोद कांबळे, उपशहर संघटक सुरेखा सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मीकांत भोसले, नारायण गायकवाड, उपविभागप्रमुख शैलेश गवळी, स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते.

























































