महड देवस्थानच्या जागेचे सर्वेक्षण ‘मंगलम’ने रोखले, अधिकाऱ्यांना गेटबाहेरच ताटकळत ठेवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महड देवस्थानची 52 गुंठे जमीन खालापूरच्या कुंभिवली गावातील कापूर उत्पादक मंगलम कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या जागेचा सर्व्हे करण्यासाठी अधिकारी व देवस्थानचे विश्वस्त 11 जून रोजी कंपनीत आले होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने या सर्वांना कंपनीत एण्ट्री दिली नाही. त्यांना गेटबाहेरच ताटकळत ठेवले. त्यामुळे अधिकाऱ्यांना सर्व्हे न करता परत जावे लागल्याने ‘मंगलम’ विरोधात भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

मंगलम कंपनीत श्री क्षेत्र महड देवस्थानच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी देवस्थानने शासकीय सर्व्हे करण्यासाठी रितसर पैसे भरून परवानगी मिळवली होती. त्याअनुषंगाने भूमिअभिलेख विभागाचे मोजणीदार पोलीस बंदोबस्तात मंगलम कंपनीत प्रवेश करण्यासाठी गेले. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले.

भूमिअभिलेख विभागाचे मोजणीदार अधिकारी दीपमाला राजपूत, देवस्थान कमिटीचे विश्वस्त किरण काशिकर, व्यवस्थापक अतुल टट्टू आणि कर्मचारी तीन ते चार तास कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बसून राहिले. अखेर दीपमाला राजपूत यांना सर्व्हसाठी कंपनीत प्रवेश दिला नसल्याचा पंचनामा केला. त्यानंतर उपस्थित साक्षीदारांच्या सह्या घेऊन त्या माघारी परतल्या.

सर्व्हेसाठी पुन्हा प्रयत्न करणार

महड देवस्थानची 52 गुंठे जागा मंगलम कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आहे. मात्र कंपनीने या जागेचा सर्व्हे करू दिला नाही. असे असले तरी आम्ही पुन्हा सर्व्हे करण्यासाठी प्रयत्न करू, असे महड देवस्थानचे विश्वस्त किरण काशिकर यांनी सांगितले.