महापालिकेकडून बेकायदा शाळांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियमांचे उल्लंघन करून फोफावलेल्या बेकायदा शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार नोटीस बजावूनही राजरोसपणे सुरू असलेल्या या शाळांना दणका देत प्रशासनाने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईदरम्यान प्रशासनाने एम पूर्व विभागातील 37 शाळांसह मालाड विभागातील काही अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा बाजार मांडलेल्या संस्थानांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

महापालिकेकडून यंदा बेकायदा शाळांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मुंबईत 164 बेकायदा शाळांचा समावेश असल्याचे उघड झाले. गतवर्षी ही संख्या 184 होती. या बेकायदा शाळांना टाळे लावण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या; मात्र फक्त नऊच शाळा बंद झाल्या. प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱया या शाळांना धडा शिकवण्यासाठी शिक्षण विभागाने 11 जून रोजी एम पूर्व विभागातील एका शाळेवर पहिला गुन्हा दाखल केला. सोमवारी ही कारवाई सुरू ठेवत प्रशासनाने विभागातील 36 बेकायदा शाळांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज महापालिका प्रशासनाने त्यांचा मोर्चा मालाड विभागात वळवला. प्रशासनाने बुधवारी विभागातील काही शाळांविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई पुढेही अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश देण्याचे आदेश

कारवाईदरम्यान बेकायदा शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून महापालिकेसह अनुदानित व विनाअनुदानित शाळेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला तत्काळ प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पालकांनी जागरूक राहून मुलांचा बेकायदेशीर शाळेत प्रवेश घेणे टाळावे असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.