‘मन की बात’ ऐकण्याची विद्यार्थिनींना सक्ती; गैरहजर राहिल्यास दंड, चंद्रपूरच्या विधी महाविद्यालयातील प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरच्या शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ ऐकण्याची सक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्यास दंडाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात रविवार, 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता ‘मन की बात’ कार्यक्रमाचे विशेष प्रक्षेपण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी तुमची उपस्थिती अनिवार्य आहे, अशा लेखी सूचना शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या गणवेशात यावे, असेही सूचनेत नमूद करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे अनुपस्थित राहिल्यास दंड ठोठावण्याचा इशाराही देण्यात आला आहे. लेखी सूचनांचे हे पत्रक व्हायरल झाले आहे.

सूचना एक, प्रश्न अनेक

 महाविद्यालयात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघेही शिक्षण घेत असताना या कार्यक्रमासाठी केवळ विद्यार्थिनींनाच का बोलावण्यात आले?
विद्यार्थिनींच्याच निवडीमागील निकष काय, हा निर्णय कोणी घेतला आणि त्यामागील नेमका उद्देश काय?
 सार्वजनिक जीवनातील घडामोडींची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे हा शैक्षणिक उपक्रमांचा भाग असू शकतो, मात्र त्यातील सहभाग स्वेच्छा असावा. त्यासाठी दंडाची गरज का पडावी?

महाविद्यालयाचा खुलासा

‘मन की बात’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थिनींना कुठल्याही प्रकारची सक्ती केलेली नाही. विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्यामुळे अशा सूचना द्याव्या लागतात. तीन दिवसांपूर्वी सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष महाविद्यालयात येऊन गेले. त्यानंतर विद्यार्थिनींना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आले, अशी सारवासारव शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पूर्णेंदू कार यांनी केली.