ठाण्यातील प्रस्तावित डेटा सेंटरला स्थगिती द्या! आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणेकरांवर जबरदस्तीने लादल्या गेलेल्या प्रस्तावित अॅमेझॉन एआय डेटा सेंटरला स्थगिती द्या, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ठाणे शहरात अॅमेझॉनचा डेटा सेंटर प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे शहर व परिसरावर होणाऱया संभाव्य परिणामांबाबत आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला होता. आदित्य ठाकरे यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन या ठिकाणाची पाहणी केली होती. आदित्य ठाकरे यांच्या आंदोलनानंतर सरकारने डेटा सेंटरच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. ही समिती तीन महिन्यांच्या आत अंतिम अहवाल सादर करणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ‘समितीच्या निष्कर्षानंतरच प्रकल्पाच्या संभाव्य परिणामांचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होणार असल्याने, समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत या डेटा सेंटर प्रकल्पाला स्थगिती देण्यात यावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील पाणीपुरवठा आणि वीज वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडणार का, डिझेल जनरेटरमधून होणारे उत्सर्जन, ध्वनिप्रदूषण आणि उष्णतेचा स्थानिकांर काय परिणाम होईल, याचा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे, याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

पत्रातील ठळक मुद्दे

 सरकारने स्थापलेल्या 17 सदस्यीय काकोडकर समितीमध्ये स्थानिक पातळीवर लोकचळवळीत कार्यरत असलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱयांचाही समावेश करावा.
डेटा सेंटर व एआय डेटा सेंटरविषयक धोरण, अशा प्रकल्पांच्या मंजुरीचे निकष व अटी, पाणी व वीज वापराचे नियोजन, पर्यावरण आणि नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांबाबत शासनाकडून स्पष्टता देण्यात यावी.  स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका, नागरिकांचा सहभाग आणि प्रकल्पांच्या मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबतही सविस्तर माहिती देण्यात यावी.

‘एक्स’ पोस्टमध्ये प्रश्नांचा भडिमार

हा प्रकल्प एखाद्या ‘रेड इंडस्ट्री’ एमआयडीसी क्षेत्रात का हलवला जाऊ शकत नाही?  कोणत्या धोरणामुळे बिल्डरला हे डेटा सेंटर येथे आणण्याची परवानगी मिळाली?
शासन फक्त बिल्डर्सचेच म्हणणे ऐकून घेणार का? बिल्डरच्या फायद्यासाठी शासन नागरिकांकडे दुर्लक्ष करणार का?

शिवसेना गिरणी कामगारांच्या पाठीशी

गिरणी कामगारांचे मुंबईबाहेर पुनर्वसन करण्याचा घाट सरकारने घातला असून त्याला गिरणी कामगार आणि वारसांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांच्या शिष्टमंडळाने शनिवारी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गिरणी कामगारांच्या मागण्या, हक्क आणि पुनर्वसनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर उपस्थित होते.