
हिंदुस्थानने दुसऱ्या वन डेत शुभमन गिल आणि इशान किशनच्या वैयक्तिक झंझावाती शतकानंतर अफगाणिस्तानचाही 170 धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. याचबरोबर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने पहिली वन डे मालिका जिंकली.
403 धावांचा पाठलाग करणाऱया अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली तरी हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. रहमत शाहने 79, सेदिकुल्लाह अटलने 42 आणि रहमानुल्लाह गुरबाजने 41 धावा केल्या. मात्र अन्य फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे अफगाणिस्तानचा डाव 44.3 षटकांत 232 धावांत आटोपला. अर्शदीप सिंग आणि गुरनूर बरार यांनी प्रत्येकी तीन, तर प्रिन्स यादवने दोन विकेट घेत अफगाणिस्तानचा पराभव आधीच निश्चित केला होता.
हिंदुस्थानने गिलच्या 110 चेंडूंतील 154 आणि इशानच्या 79 चेंडूंतील 125 धावांनी संघाला 36 व्या षटकातच 320 धावांपर्यंत नेले होते. या दोघांनी तिसऱया विकेटसाठी 224 धावांची घणाघाती भागी केल्यामुळे हिंदुस्थानला 450 धावांचा टप्पा गाठण्याची संधी होती, पण ही जोडी फुटल्यानंतर हिंदुस्थानचा डाव कोलमडला. गिलने आज नववे शतक साकारताना तीन हजार धावांचा टप्पाही गाठला. शेवटच्या 14 षटकांत धावसंख्येत 7 विकेटच्या बदल्यात 88 धावांचीच भर घालता त्यामुळे 49.5 षटकांत 402 धावांवर डाव संपला. तसेच वन डे इतिहासात हिंदुस्थानने आठव्यांदा 400 पेक्षा अधिक धावा करत दक्षिण आफ्रिकेची बरोबरी साधली. अफगाणी नांगेयालिया खरोटेने 4 तर राशीद खानने 3 विकेट टिपत हिंदुस्थानच्या डावाला 400 पर्यंत रोखले.




























































