
हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाने अफगाणिस्तान ‘अ’ संघावर शतकी विजय साकारला. हिंदुस्थानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 319 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाचा डाव 210 धावांत गुंडाळत हिंदुस्थानने 101 धावांनी दणदणीत विजय साकारला.
वैभव सूर्यवंशी या सामन्यातही अर्धशतक झळकवण्यात अपयशी ठरला. त्याला 38 धावा करता आल्या, पण दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने मात्र ही संधी साधत अर्धशतक साकारले. त्याने 9 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 58 धावा केल्या. संघाचा कर्णधार तिलक वर्मालाही यावेळी चांगली लय सापडली होती, त्याला कुमार कुशाग्राची चांगली साथ मिळाली. तिलक व कुमार यांनी प्रत्येकी पाच चौकार लगावले. तिलकने यावेळी 59 तर कुमारने 59 धावा फटकावल्या. विपराज निगमने 30 धावा करत संघाला तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला.
अफगाणिस्तानकडून फक्त बशिर शाहलाच (57) अर्धशतक झळकवता आले. भारताकडून निशांत सिद्धूने सर्वाधिक चार विकेट्स मिळवले.




























































