
तब्बल 28 वर्षांनंतर फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करणाऱ्या ऑस्ट्रियाने दमदार खेळ करत ‘जे’ गटातील सामन्यात पदार्पण करणाऱया जॉर्डनचा 3-1 गोलफरकाने पराभव केला. लेव्ही स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रियाने अनुभवाच्या जोरावर हा विजय मिळवला.
सामन्याच्या पहिल्या सत्रात रोमानो श्मिड याने दूरवरून केलेल्या अप्रतिम फटक्याच्या जोरावर ऑस्ट्रियाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात ही आघाडी कायम राहिली. दुसऱया सत्रात जॉर्डनने जोरदार प्रतिकार करत अली ओलवानच्या गोलमुळे बरोबरी साधली. त्यामुळे सामना रंगतदार बनला, मात्र काही वेळातच जॉर्डनच्या खेळाडूकडून झालेल्या आत्मघातकी गोलमुळे ऑस्ट्रियाला पुन्हा आघाडी मिळाली. ऑस्ट्रियाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू माका अर्नाउटोव्हिच याला सुरुवातीला संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, तो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि इंज्युरी टाईममध्ये पेनल्टीवर अचूक गोल करत ऑस्ट्रियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रियाचा कर्णधार डेव्हिड अलाबा याने बचावफळीतून संघाचे नेतृत्व केले. विश्वचषक पात्रता फेरीतील अखेरच्या दोन सामन्यांत तो खेळला नव्हता. त्यामुळे त्याचे पुनरागमन संघासाठी महत्त्वाचे ठरले.
जॉर्डनकडून आघाडीवर अली ओलवान आणि स्टार विंगर मौसा अल-तमारी यांच्यावर मोठी जबाबदारी होती, मात्र संघाचा प्रमुख आक्रमक याझान अल-नायमत दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकल्याचा फटका जॉर्डनला बसला. पात्रता फेरीत त्याने आठ गोल केले होते.

























































