
शिवसेनेच्या खासदारांची तातडीची बैठक उद्या दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे काही खासदार पक्षातून फुटून वेगळा गट स्थापन करणार असल्याचे वृत्त सकाळपासून देशभर ‘फिरत’ होते. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली असून शिवसेनेने सर्व खासदारांना व्हीपही बजावला आहे. संसद भवनातील शिवसेनेच्या संसदीय कार्यालयात सकाळी 11 वाजता ही बैठक होईल.
शिवसेना पक्ष संघटनेशी संबंधित अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. दिवसभर प्रसारमाध्यमांनी चालवलेली बातमी व त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेची या बैठकीला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष बैठकीकडे लागून राहिले आहे. शिवसेना पक्षाचे प्रतोद खासदार अनिल देसाई यांनी व्हीपची माहिती पत्रकारांना दिली.
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भरगच्च पत्रकार परिषद झाली. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत, मुख्य प्रतोद अनिल देसाई आणि खासदार राजाभाऊ वाजे यावेळी उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. ते म्हणाले, कालपासून ‘ऑपरेशन टायगर’च्या बातम्या पसरवल्या जात आहेत. टीव्हीच्या माध्यमातून आम्ही ते पहात आहोत, ऐकत आहोत. परंतु आमच्यापर्यंत अद्यापि अशी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. या क्षणापर्यंत तरी आम्ही सगळे एकत्र आहोत. एकजूट आहोत असे आम्ही मानतो. स्वतंत्र गट करण्यासाठी कोणी पत्र दिले आहे किंवा नाही आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आम्ही आताच कुणावरही आरोप करणार नाही. ज्या काही बातम्या येत आहेत, त्यात तथ्य नसेल तर संबंधित खासदारांनी समोर येऊन त्याचे खंडन केले पाहिजे. मात्र अशा पद्धतीने कधी तृणमूल, कधी शिवसेना कधी इतर पक्ष फोड जात असतील तर या देशात निवडणुका लढण्याला काही अर्थ नाही.
महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही!
‘आमच्या ज्या खासदारांची नावे बातम्यांमध्ये येत आहेत, ते सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चेहऱयावर निवडून आलेले आहेत. ते आमच्याशी बेइमानी करू शकत नाहीत. तसे काही करण्याचा प्रयत्न झाल्यास यावेळी शिवसैनिक आणि महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही,’ असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी चर्चा
दिवसभर बातम्यांचे गुऱहाळ सुरू असतानाच संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी या राजकीय बातम्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. ‘खासदार स्वतंत्र गट’ स्थापन करणार असल्याच्या बातम्या आम्ही ऐकत आहोत त्याबाबत ठोस दुजोरा नसला तरी आपण या घटनांची दाखल घ्यावी अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली. यावेळी त्यांना एक सविस्तर निवेदनही देण्यात आले. त्यानुसार खासदारांचा असा गट आलाच तर त्यांच्या कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी मूळ पक्षाशी चर्चा करावी, असे सुचवले आहे. अशा प्रकारे कोणत्याही गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी करतानाच तशी मान्यता दिली असेलच तर ती तत्काळ रद्द करावी, असे आग्रही प्रतिपादनही या निवेदनात करण्यात आले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती किंवा एखादा गट मूळ पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाही. दोन तृतीयांश बहुमत असले तरी तसे करता येत नाही. केवळ मूळ पक्षच पुरेशा संख्याबळासह दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो. याकडेही लोकसभा अध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले.
स्थळ शिवसेना संसदीय कार्यालय
वेळ सकाळी 11 वाजता



























































