खामगाव एसडीओ कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ravikant-tupkar resigns from swabhimani shetkari sanghtana

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून काही ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफीविरोधात आंदोलन तीव्र केले आहे. विविध भागांत कर्जमाफीचा जीआर जाळण्याचे प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी कार्यालय परिसरात ज्वलनशील साहित्य टाकल्याचे सांगितले जात आहे.

चिखली-खामगाव मार्गावरील पेठ पुलावर काही आंदोलकांनी टायर जाळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी किनगाव जट्टू येथे एसटी बसला आग लागल्याची घटना घडली होती. पोलिसांनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असला, तरी या घटनेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा मंगळवारी तिसरा दिवस होता. प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर येत असताना त्यांनी शेतकरी बांधवांना शांतता आणि संयम राखून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.