
व्हॉट्सॲप युजर्ससाठी एक वेगळे फीचर आणणार आहे. लवकरच ॲप उघडल्याशिवाय व्हॉइस मेसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. अँड्रॉइडच्या बीटा आवृत्तीत व्हॉट्सॲप एका नव्या होमस्क्रीन विजेटवर काम करत आहे. या विजेटच्या मदतीने युजर्सना थेट मोबाईलच्या होमस्क्रीनवरून व्हॉइस नोट रेकॉर्ड करून ती इतरांना पाठवता येणार आहे.
व्हॉट्सॲपच्या नव्या फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. हे फीचर व्हॉट्सॲप बीटा फॉर अँड्रॉइड आवृत्ती 2.26.24.2 मध्ये आढळून आले आहे. ही आवृत्ती सध्या Google Play Store वरील बीटा चाचणी कार्यक्रमाचा भाग आहे.
सध्या व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी युजर्सना व्हॉट्सॲप उघडावे लागते, संबंधित चॅटमध्ये जावे लागते आणि त्यानंतर व्हॉइस नोट रेकॉर्ड करावी लागते. मात्र नव्या विजेटमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. युजर्स थेट होमस्क्रीनवरून व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून निवडक संपर्कांना पाठवू शकतील.
WABetaInfo ने शेअर केलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे विजेट सुरुवातीला 3×1 आकारात दिसेल. मात्र ते होमस्क्रीनवर जोडल्यावर युजर्सना त्याचा आकार बदलण्याची सुविधाही मिळू शकते.
या नव्या सुविधेचा आणखी एक फायदा म्हणजे एकाच वेळी अनेक Contacts ना सेम व्हॉइस मेसेज पाठवण्याचे फीचर आहे. त्यामुळे एखादा व्हॉइस मेसेज पुन्हा पुन्हा फॉरवर्ड करण्याची गरज पडणार नाही
याशिवाय, या विजेटद्वारे रेकॉर्ड केलेल्या व्हॉइस नोट्स थेट व्हॉट्सॲप स्टेटस म्हणूनही शेअर करता येण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. वारंवार व्हॉइस मेसेजद्वारे संवाद साधणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर विशेष उपयुक्त ठरू शकते.
दरम्यान, व्हॉट्सॲप आणखी एका होमस्क्रीन विजेटवरही काम करत आहे. हे विजेट युजर्सना अलीकडील स्टेटस अपडेट्स दाखवेल तसेच नवीन स्टेटस पोस्ट करण्यासाठी शॉर्टकट उपलब्ध करून देईल. हे फीचरही अद्याप विकासाच्या टप्प्यात असून चाचणीसाठी उपलब्ध करण्यात आलेले नाही.
व्हॉट्सॲपकडून अलीकडे होमस्क्रीन विजेट्सवर विशेष भर दिला जात आहे. युजर्सना ॲप उघडण्याची गरज न पडता वारंवार वापरल्या जाणाऱ्या सुविधांपर्यंत जलद प्रवेश मिळावा हा यामागील उद्देश असल्याचे मानले जात आहे.
सध्या व्हॉइस मेसेज विजेट आणि स्टेटस विजेट या दोन्ही सुविधा विकासाच्या टप्प्यात आहेत. व्हॉट्सॲपने अद्याप या फीचर्सच्या अधिकृत लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र येत्या काळात बीटा आवृत्तीत त्यांची चाचणी सुरू होऊन नंतर सर्वसामान्य युजर्ससाठी स्थिर आवृत्तीत उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
























































