वादग्रस्त समय रैनाचा शो पुन्हा दिसणार, रिलीजची तारीख गुलदस्त्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉमेडियन आणि कंटेंट क्रिएटर समय रैना याचा लोकप्रिय शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र त्याचबरोबर शोचे भाग समय रैनाच्या यूट्यूब चॅनेलवरही उपलब्ध राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शोच्या निर्मात्यांनी एक वेगळी वितरण रणनीती आखली आहे. यामुळे ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा यूट्यूबवरील प्रचंड डिजिटल प्रेक्षकवर्ग कायम राहील, तर दुसरीकडे नेटफ्लिक्ससारख्या जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममुळे शो ची पोहोच आणखी वाढणार आहे.

या नव्या पर्वाचे चित्रीकरण सध्या सुरू असून पुढील महिन्यात शोचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नियमित भागांव्यतिरिक्त समय रैना नेटफ्लिक्ससाठी एक विशेष भागही चित्रित करणार आहे. हा भाग केवळ नेटफ्लिक्सवरच प्रदर्शित केला जाईल. या विशेष एपिसोडचे स्वरूप, पाहुण्यांची यादी आणि रीलीजची तारीख याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी या त्यांच्या आगामी ‘अल्फा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये सहभागी होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो सुरुवातीला एक डिजिटल प्रयोग म्हणून सुरू झाला होता. मात्र अल्पावधीतच तो देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या डिजिटल मनोरंजन कार्यक्रमांपैकी एक बनला. स्पर्धकांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण, उत्स्फूर्त विनोद आणि सेलिब्रिटी परीक्षकांशी होणारे अनफिल्टर्ड संवाद यामुळे या शोने मोठी लोकप्रियता मिळवली.

मात्र याच वर्षी हा शो वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया सहभागी असलेल्या एका भागातील काही वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर शोविरोधात कायदेशीर आव्हाने उभी राहिली होती. तसेच काही भाग सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आले होते. त्यामुळे शोच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या वादानंतरही समय रैना याने चाहत्यांना ‘इंडियाज गॉट लेटेंट’ पुन्हा परत येईल, असे आश्वासन दिले होते. आता नेटफ्लिक्स आणि यूट्यूब या दोन्ही माध्यमांवर शोच्या पुनरागमनाची तयारी सुरू झाल्याने त्या आश्वासनाची पूर्तता होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)