
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन महिन्यांपासून एमबीबीएस डॉक्टरचे पद रिक्त असल्याने 25 दुर्गम गावांच्या आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर कोठुळे यांची 26 मार्च रोजी धुळे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. सध्या आरोग्य केंद्राचा भार बीएएमएस डॉक्टरवर असून एमबीबीएस डॉक्टरांची प्रतीक्षा कायम आहे.
बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रावर पंचक्रोशीतील सुमारे 20 ते 25 दुर्गम गावांतील नागरिक उपचारासाठी अवलंबून आहेत. तसेच कार्यक्षेत्राबाहेरील रुग्णही मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे या केंद्रावरील कामाचा मोठा ताण आहे. एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नसल्याने बाह्यरुग्ण विभाग अधिक सक्षमपणे चालवणे, आपत्कालीन रुग्णांवर तातडीने उपचार करणे, गंभीर न्यायवैद्यकीय प्रकरणे व प्रसूतीसंबंधित गुंतागुंतीच्या परिस्थिती हाताळणे तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मर्यादा येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक वैद्यकीय निर्णय घेणे आणि रुग्णांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे यावरही परिणाम होत आहे.
तीन महिन्यांपासून ‘एमबीबीएस’ डॉक्टरची प्रतीक्षा
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अभावी होत असलेल्या गैरसोयीची आम्हाला जाणीव आहे. शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सरळसेवा भरती प्रक्रियेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली जात आहेत. त्यामुळे लवकरच बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, असे रायगडचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी सांगितले.

























































