
भांडुप संकुल येथे पालिकेच्या माध्यमातून दोन हजार दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करणारा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगराला पाणीपुरवठा करणाऱया या प्रकल्पामुळे जल शुद्धीकरणाची क्षमता वाढणार असून रहिवाशांना अधिक शुद्ध पाणी मिळण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
जल शुद्धीकरण प्रकल्पाची पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज पाहणी करून कामाचा आढावा घेतला. भांडुप संकुलातील 7.4 हेक्टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला अधिक शुद्ध पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. ज्यामुळे पाण्याची वाढती गरज भागवणेदेखील शक्य होणार आहे.
सद्यस्थितीत माती परीक्षण, खोदकाम, प्रकल्पस्थळास
बॅरेकेडिंग, वीजवाहक तारांच्या मनोऱयांचे स्थलांतरण, वृक्षारोपण आदी कामांना वेग मिळाला आहे. स्थापत्य कामांसह यांत्रिकी, विद्युत व उपकरणीयकरणाची कामे समांतरपणे सुरू करण्यात आली आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून प्रकल्प कामे वेगाने पूर्ण करावीत. खोदकाम, राडारोडय़ाची वाहतूक यांचे नियोजन करावे, असे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.
जुलै 2028 पर्यंत प्रकल्प पूर्ण
भांडुप संकुल येथील 1910 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम सुमारे 43 वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. हा प्रकल्प संरचनात्मकदृष्टय़ा कमकुवत झाल्याने 2,000 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे.
मलजल प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात
भांडुप येथील 215 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्याचे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने पालिकेकडून एकूण 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येत आहेत.




























































