महिलांबद्दल कुत्सित मानसिकता असलेली व्यक्ती नोकरीस अपात्र, हायकोर्टाने आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या समाजाच्या कल्याणासाठी नेमलेल्या संस्थेत आपण काम करतो, त्याच समाजातील महिलांबद्दल चालकाची मानसिकता कुत्सित आणि अशोभनीय असेल तर अशी व्यक्ती सदर ठिकाणी नोकरी करण्याच्या पात्रतेची नाही असे सुनावत हायकोर्टाने चालकाची सेवा समाप्त करण्याचा निर्णय वैध ठरवला.

नितीन म्हात्रे या चालकाची नेमणूक जानेवारी 2001 मध्ये उत्तन मच्छीमार व वाहतूक सहकारी संस्थेत करण्यात आली होती. ऑक्टोबर 2006 मध्ये म्हात्रे याने संस्थेच्या उपाध्यक्षांशी अरेरावीची भाषा वापरली आणि त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या कोळी महिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. या गैरवर्तणुकीची दखल घेत संस्थेने जानेवारी 2007 मध्ये म्हात्रे याची सेवा समाप्त करत हकालपट्टी केली. म्हात्रे याने या कारवाईला कामगार न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, 2015 मध्ये कामगार न्यायालयाने म्हात्रे याच्या विरोधात निर्णय देऊन त्याची हकालपट्टी योग्य ठरवली. यानंतर औद्योगिक न्यायालयात म्हात्रे याने धाव घेतली व कामगार न्यायालयाच्या निकालाला आव्हान दिले. 2021 मध्ये औद्योगिक न्यायालयाने कामगार न्यायालयाचा निर्णय रद्द करत म्हात्रे याची हकालपट्टी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. तसेच, त्याला कामावर घेण्याचे आणि 5 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश संस्थेला दिले होते.