
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2,640 घरांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी 75,366 अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, सर्वाधिक अर्ज पंतप्रधान आवास योजनेतील गोरेगावमधील घरांसाठी आले आहेत. येथील 13 घरांसाठी तब्बल 17,755 अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजे एका घरासाठी 1365 अर्जदारांमध्ये चुरस असणार आहे. घरांच्या तुलनेत अर्जांची संख्या पाहता नशिबात असेल तरच मिळेल असे म्हणायची वेळ आली आहे.
मुंबई मंडळाने कन्नमवार नगर-विक्रोळी, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि ऍण्टॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांसाठी 2,640 सदनिकांची सोडत जाहीर केली होती. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 858, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 839 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीसाठी प्राप्त स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी नुकतीच म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हाडाला प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्वाधिक अर्ज गोरेगावातील 13 घरांसाठी आले आहेत. अत्यल्प गटासाठी असलेल्या या घरांची किंमत 32 लाख 36 हजार रुपये आहे.
मानखुर्द, ताडदेवमधील घरांकडे पाठ
या लॉटरीतील सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी मानखुर्द येथे असून त्याची किंमत 29 लाख 37 हजार रुपये आहे. चार घरांसाठी सोडतीत समावेश असून या घरांसाठी केवळ 48 अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वात महागडे घर ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये असून त्याची किंमत 6 कोटी 82 लाख रुपये आहे. येथील दोन घरांसाठी 21 अर्ज आले आहेत.






























































