
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने दोन वेगवेगळ्या कारवाया करत सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. जप्त केलेल्या दागिन्यांची आंतरराष्ट्रिय बाजारातील किंमत 3 कोटी रुपये आहे. याप्रकरणी हिंदुस्थानी वंशाच्या कॅनडाच्या नागरिकासह एअरलाईन कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्या कारवाईत टोरोंटोवरून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या कॅनडाच्या नागरिकाकडून हिरे जडीत दागिने हस्तगत करण्यात आले. या दागिन्यांची किंमत 1.21 कोटी रुपये इतकी आहे. अधिकाऱ्यांनी सदर व्यक्तीला अटक केली असून, सुखपाल सिंग (34) असे केलेल्या कॅनेडियन नागरिकाचे नाव आहे. सिंग याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात हिऱ्यांचे दागिने सापडले.
दुसऱ्या कारवाईत एअरलाइन कर्मचाऱ्याला अटक करत त्याच्याकडील सोन्याची पूड (गोल्ड डस्ट) जप्त केली आहे. एस. एस. गुरव (48) असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. एअरलाइन कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना गुरवच्या हालचालींवर संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याला सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. गुरवने विमानातील स्वच्छतागृहातून (lavatory) मेणाच्या स्वरूपातील 24 कॅरेट सोन्याची पूड हस्तगत केली होती आणि ती आपल्या साफसफाईच्या ट्रेमध्ये लपवून ठेवली होती.
संबंधित कर्मचारी आणि काळ्या टेपने गुंडाळलेल्या पाकिटांची तपासणी केली असता त्यात पिवळ्या रंगाचा मेणासारखा पदार्थ असलेली दोन पाकिटे सापडली; हा पदार्थ मेणाच्या स्वरूपातील सोन्याची पूड असल्याचे मानले जात आहे. अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबत गुरवने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



























































