
शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुरुवारी दिल्लीतील संसदीय कार्यालयात खासदारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याचा व्हीपही सर्व खासदारांना बजावण्यात आला होता. मात्र या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर शिवसेनेकडून या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी दिली आहे. तसेच या नोटीसीला सात दिवसात उत्तर दिले नाही तर खासदारांवर कारवाई करू असा इशारा देखील देण्यात आला आहे.
”पक्षाच्या बैठकीला आज जे सदस्य उपस्थित राहिले नाही तो पक्षद्रोह आहे. आमच्या पक्षाचा पक्षादेश जारी केलेला व त्यानंतरही ते हजर राहिले नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असून संध्याकाळ पर्यंत सर्वांना ही नोटीस मिळेल. नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत उत्तर नाही आले तर आम्ही कारवाई करू”, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.
”ओमराजे पुण्यात आहेत, संजय दिना पाटील मुंबईत आहेत. ते दिल्लीत नाही. ते कुठे आहेत, शिंदेंच्या लोकांनी त्यांचं अपहरण केलंय, त्यांच्या जीवाला धोका आहे का? हे लोकं काहीही करू शकतात. हे सगळं बघावं लागेल. आमचा त्यांच्याशी संपर्क झाला नाही. चार पाच खासदार म्हणजे पक्ष नाही. त्यांना खासदार बनवणारा पक्ष आहे, कार्यकर्ते आहेत. तेच कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहेत. तुमच्या मतदारसंघात जाऊन दाखवा. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. तुम्हाला घरात राहणं मुश्कील होणार आहे. त्यांना फौज घेऊन घरी जावं लागणार आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगावर देखील निशाणा साधला. ”कोर्ट गेल्या चार वर्षात काही निर्णय घेऊ शकला नाही. आता जे काही घडतंय त्यात सर्वोच्च न्यायालय देखील गुन्हेगार आहे. देशात लोकशाहीचे जे धिंडवडे काढले जात आहेत त्याला जबाबदार निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय देखील आहे”, असे संजय राऊत म्हणाले
हे खासदार होते गैरहजर
शिवसेनेच्या संसदीय बैठकीला खासदार संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश आष्टीकर हे गैरहजर होते.




























































