
कुटुंबासोबत न्यूयॉर्कला गेलेल्या हिंदुस्थानी किशोरवयीन मुलाचा घोडाघाडीचा अपघातात मृत्यू झाला. रोमांच महाजन (18) असे मयत मुलाचे नाव आहे. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध सेंट्रल पार्कमध्ये बुधवारी ही घटना घडली. यात कुटुंबातील अन्य सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, महाजन कुटुंब न्यूयॉर्कला सहलीला गेले होते. बुधवारी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध सेंट्रल पार्कमध्ये महाजन कुटुंबीय घोडागाडी सवारीचा आनंद घेत होते. रोमांचचे वडील दीपक महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान घोडागाडी चालक खाली उतरून कुटुंबाचा फोटो घेत असतानाच घोडा बिथरला आणि वेगात धावू लागला. यामुळे रोमांचची आई घोडागाडीतून खाली पडली. आईला वाचवण्यासाठी रोमांचने उडी घेतली.
मात्र या थरारक घटनेदरम्यान मदतीसाठी महाजन कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने घोडा घाबरला आणि आणखी वेगात पळू लागला. यामुळे घोडागाडी उलटली. यात रोमांचच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी न्यूयॉर्क-प्रेस्बिटेरियन वील कॉर्नेल मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पार्कमधील या गाड्यांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.


























































