
वडगाव पान येथील तथाकथित भोंदूबाबा राजेंद्र गडगे ऊर्फ ‘गडगेबाबा’ प्रकरणात गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटूनही मुख्य आरोपी डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे आणि सूरज शिंदे हे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असतानाही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी नाराजी व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षक मम्मुका सुदर्शन यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, फिर्यादी अॅड. गवांदे यांना बदनाम करण्यासाठी आणि दबाव टाकण्यासाठी बनावट व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपींसह आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे सांगत संबंधितांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, एप्रिल महिन्यात आरोपींकडून धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचे आणि त्यासंदर्भातील पुरावे उपलब्ध असल्याचा दावा गवांदे यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे आश्रम परिसरात सापडलेला कथित बनावट औषधसाठा आणि त्यामागील जाळे. कोणताही वैध परवाना नसताना औषधांचा साठा व विक्री सुरू असल्याचे पंचनाम्यात नमूद झाल्याचा दावा करण्यात आला असून, अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय दत्तधाम सरकार ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी, बेनामी मालमत्तेचा तपास तसेच गावातील नागरिकांच्या घरांवर बेकायदेशीररीत्या ड्रोन फिरवल्याच्या तक्रारींची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, फरार आरोपींना तातडीने अटक करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.


























































