मान्सूनसाठी आठवडाभर प्रतीक्षा, ‘एल-निनो’मुळे दुष्काळाचे सावट गडद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे देशावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. ‘एल-निनो’मुळे मुंबई, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भासह देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचे आगमन लांबले असून ऐन मान्सूनचा जोर वाढतो, त्याच काळात ‘एल-निनो’ची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण बदलणार आहे. काही भागांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश मान्सूनसाठी किमान आठवडाभर प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

देशाची अर्थव्यवस्था शेतीप्रधान आहे. त्यामुळे मान्सून देशाच्या अर्थचक्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, यंदा प्रशांत महासागरात ‘एल-निनो’ सक्रिय झाला असून त्याची तीव्रता जास्त राहणार आहे. परिणामी हिंदुस्थानमध्ये अनेक भागांमध्ये मान्सून लांबणीवर पडला आहे. काही भागांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, तर काही राज्यांना अल्पावधीत अतिवृष्टीचा तडाखा बसू शकतो. मान्सून लांबणीवर पडल्यामुळे नागरिक प्रचंड उकाडय़ामुळे हैराण झाले आहेत. विदर्भातील काही भागात अजूनही उष्णतेचा तडाखा कायम आहे.

सुपर ‘एल-निनो’चा धोका

अमेरिकेच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘एल-निनो’ सक्रिय झाला असून त्यामुळे प्रशांत महासागराचे तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये ‘सुपर एल-निनो’ची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असून फेब्रुवारी 2027 पर्यंत ही स्थिती कायम राहू शकते. यामुळे समुद्रातील तापमान 2 अंशांपेक्षा जास्त वाढण्याचा धोका आहे. ही 150 वर्षांमधील सर्वात भीषण ‘सुपर एल-निनो’ स्थिती राहू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी 1876 मध्ये सुपर एल-निनोमुळे प्रशांत महासागराचे तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढले होते. यापूर्वी वर्ष 1972, 1982, 1997 आणि 2015मध्ये सुपर एल-निनोमुळे अनेक देशांना दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला होता.

मान्सून कोकणात रखडला

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आणि पूर्वेकडील काही भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, दक्षिण भारत आणि ईशान्येकडील काही भागात मान्सून दाखल झाला. मात्र, कोकणात मान्सून रखडला आहे. मुंबईत  मान्सून दाखल होण्यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.