टिटवाळ्यात घरात घुसून हातोड्याने तोडफोड, महिलांवर हल्ला, अल्पवयीन मुलीचाही विनयभंग; भाजपच्या पदाधिकाऱ्यासह 12 जणांवर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिटवाळा परिसरात चाळमाफियांनी तुफान धुडगूस घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हप्ता देण्यास वृद्धेने नकार दिल्याने बसमधून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दहा ते बारा गुंडांनी हातात हातोडे तसेच लाठ्याकाठ्या घेऊन सद्‌गुरू चाळीत राडा केला. घरात घुसून तोडफोड करतानाच महिलांवरही हल्ला केला. धक्कादायक म्हणजे काही नराधमांनी या घरातील एका अल्पवयीन मुलीचाही विनयभंग केला. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी एका भाजप पदाधिकाऱ्यासह बारा जणांच्या टोळक्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

टिटवाळा परिसरात अनधिकृत चाळी बांधून त्या गोरगरीबांना लाखो रुपयांना खुलेआम विकल्या जातात. त्यानंतर याच चाळींच्या दुरुस्तीसाठी पुन्हा लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा गोरखधंदाच चाळमाफियांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केला आहे. सद्‌गुरू चाळीतही एका वृद्धेने दुरुस्तीचे काम काढले होते. मात्र मुख्य आरोपी किरण गुजरे याने दुरुस्तीचे काम तुम्हाला करायचे असेल तर आम्हाला दीड लाखाचा हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली. मात्र या दादागिरीला संबंधित महिलेने भीक घातली नाही. त्यामुळे आरोपी किरण गुजरे, त्याचा भाऊ व भाजपचा पदाधिकारी परेश गुजरे, राजेश करोतिया, जे.डी., भूषण धुमाळ यांच्यासह दहा ते बारा गुंडांनी या महिलेच्या घरात घुसून तोडफोड केली. याप्रकरणी किरण गुजरे, परेश गुजरे यांच्यासह अन्य टोळक्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तोंडावर रुमाल, हातात घण

पीडित महिला रहात असलेल्या सद्‌गुरू चाळीतील घरासमोर एक बस आली. यातून दहा ते बारा गुंड अर्वाच्य शिवीगाळ करत एकामागोमाग एक खाली उतरले. सर्वांनी तोंडावर रुमाल बांधले होते. प्रत्येकाच्या हातात घण, लाठ्याकाठ्या होत्या. काही कळायच्या आत या सर्वांनी पीडित महिलेच्या घरावर तुफान हल्ला केला. प्रचंड तोडफोड सुरू केली. आमचं घर तोडू नका अशा मिनतवाऱ्या करणाऱ्या महिलांनादेखील या नराधमांनी सोडले नाही. त्यांचे कपडे फाडत बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर घरात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचादेखील विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. चाळमाफियांनी घातलेल्या या धुडगुसाने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे.