
संत सेवालाल महाराज सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामाचे उर्वरित बिल मंजूर करून देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शनिवारी रात्री उशिरा चैतन्यनगर परिसरातील रणवीर आर्ट या दुकानात ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी ग्रामपंचायत पांगरी पहाड ता. किनवट येथे संत सेवालाल महाराज सांस्कृतिक सभागृहाचे सुमारे 10 लाख रुपयांचे बांधकाम पूर्ण केले होते. या कामाच्या बिलापैकी 9 लाख 128 रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी मिलिंदराज शामराव दवणे (37) यांनी कामाच्या एकूण रकमेच्या 5 टक्के प्रमाणे 50 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर झालेल्या चर्चेत तडजोडीअंती 40 हजार रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले. यापैकी 25 हजार रुपये रोख आणि उर्वरित 15 हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात देण्याचे ठरले.
तक्रारदाराने पंचांसमक्ष 25 हजार रुपये चैतन्यनगर परिसरातील रणवीर आर्ट येथील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले. तसेच आरोपीच्या सांगण्यावरून दुकानातील स्कॅनरद्वारे 15 हजार रुपये ऑनलाइन जमा केले. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराला उर्वरित रकमेचा धनादेश लिहून देत त्यावर स्वाक्षरी व ग्रामपंचायतीचा शिक्का मारून दिला. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपीकडून एक मोबाईल फोन, मराठवाडा ग्रामीण बँकेचे चेकबुक, ग्रामपंचायत कार्यालयाचा शिक्का तसेच 25 हजार रुपयांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अनिता दिनकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर करीत आहेत.


























































