PoK मध्ये आंदोलन पेटले; शहबाज शरीफ, असीम मुनीर यांना ‘दहशतवादी’ म्हणत स्वातंत्र्याच्या घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकव्याप्त कश्मीरमध्ये (PoK) पाकिस्तान सरकार आणि  सैन्या विरोधातील आंदोलनाचा भडका उडाला आहे. शुक्रवारी या भागात पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आज 13 जून रोजी आंदोलकांनी पाकिस्तानातील सर्वोच्च नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे.

आंदोलकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर, पीओकेचे पंतप्रधान फैसल मुमताज राठोड आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना दहशतवादी म्हणत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलकांच्या या आरोपामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी 12 जून रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान जम्मू-काश्मीर संयुक्त अवामी ॲक्शन कमिटीच्या नेत्यांनी पाकिस्तानवर हल्ला चढवला. “हा परिसर सिंध, बलुचिस्तान किंवा डी-चौक नाही तर, हा काश्मीर आहे. येथे एक जरी मृत्यू झाला, तरी लाखो लोक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे आम्ही घाबरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जेएएसीच्या नेतृत्वाखाली पीओकेमध्ये आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून जेएएसीच्या नेतृत्वाखाली पीओकेमध्ये आंदोलन सुरू आहे. तेथील नागरिक पाकिस्तानी सत्ता आणि सैन्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या मंगळवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनात आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तरीही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

आंदोलकांच्या प्रमुख दोन मागण्या

1. पीओके विधानसभेतील शरणार्थींसाठीच्या 12 राखीव जागा’ तातडीने रद्द करण्यात याव्यात, अशी जनतेची मागणी आहे.
2. पीओकेच्या निर्वाचित नेत्यांनी घेण्याच्या शपथेमध्ये बदल करावा. पाकिस्तानप्रती निष्ठा वाहण्याऐवजी, ‘जम्मू-कश्मीरच्या एकता आणि अखंडतेप्रती’ निष्ठा वाहण्याची शपथ घेतली जावी. कारण पीओके हा पाकिस्तानचा भाग नाही, असा दावा आंदोलकांनी केला आहे.

पीओकेमध्ये पाकिस्तान सैन्याचा आंदोलनकर्त्यांवर गोळीबार; 30 हून अधिक ठार, 200 पेक्षा जास्त जखमी