
तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अमानुष अत्याचारानंतर पीडित मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी बिहारमधील एका स्थलांतरित मजुराला अटक केली आहे. पीडित मुलीचे कुटुंबही मूळचे बिहारचे असून, ते गुम्मिडीपूंडी येथील ‘एसआयपीसीओटी’ (SIPCOT) औद्योगिक क्षेत्रात राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी आरोपीला ओळखत होती. ती घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला बिस्किटाचे आमिष दाखवले आणि स्वतःसोबत निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावरलैंगिक अत्याचार केला. त्यानंतर अत्यंत गंभीर अवस्थेत त्या चिमुरडीला झाडांमध्ये सोडून तो पसार झाला. मुलीचा शोध घेत असताना रविवारी ती गंभीर जखमी अवस्थेत झाडीत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
परिसरातील रहिवासी असलेल्या एका महिलेने या घटनेची माहिती दिली. इंदुमती यांनी सांगितले की, मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला गाठले होते. त्यानंतर तो तिला घेऊन गेला आणि नंतर मुलगी झाडीत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. त्या चिमुरडीला अशा अवस्थेत पाहून महिलेने तातडीने मुलीला स्वच्छ केले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयावरून जमावाने इतर काही जणांवरही हल्ला केला. मात्र, पोलिसांनी या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. आता मुलीच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात हत्येचे कलम जोडले जाण्याची शक्यता आहे.
या क्रूर घटनेवरून राजकीय वर्तुळातूनही तीव्र पडसाद उमटत आहेत. डीएमके (DMK) नेते टी.के.एस. एलंगोवन यांनी आरोपीला कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. सरकारने अशा घटनांविरोधात अत्यंत कडक पावले उचलली पाहिजेत. ही एक गंभीर सामाजिक समस्या असून सरकारने यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे,” असे एलंगोवन यांनी म्हटले आहे.यासोबतच एलंगोवन यांनी थेट सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सत्ताधारी ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे सदस्य किंवा पदाधिकारी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.



























































