मृतदेह टाकला रुळावर, पाय लटकवला घरावर! पंढरपुरात रिक्षाचालकाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ वादातून शहरातील अनिलनगर भागातील एका तरुण रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. हल्लेखोरांनी खून करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकला, तर एक पाय त्याच्या घरावर दरवाजासमोर लटकवण्यात आला होता. ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

रोहित मधुकर कोरे (वय 24) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

रोहित कोरे याचा मृतदेह पंढरपूर येथील रेल्वे ट्रकवर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला होता, तर मृतदेहाचा एक पाय त्याच्या घरावर दरवाजासमोर लटकवण्यात आला होता. या घटनेनंतर पंढरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.

रोहित कोरे रिक्षा चालवत होता. दारू प्यायल्यानंतर त्याचा काहीजणांशी किरकोळ वाद झाला होता. या वादातून त्याचा खून केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून पंचनामा केला होता; परंतु रोहित याच्या घरावर त्याच्या पायाचा तुकडा आढळल्याने रेल्वे रुळावर आढळून आलेला मृतदेह हा रोहितचा असल्याचे समोर आले.