
‘वाघाला दात असतात, डरकाळी असते आणि स्वाभिमान असतो. मात्र, जो सतत दुसऱयांच्या आधारावर राजकारण करतो, दिल्लीसमोर नतमस्तक होतो, तो ‘टायगर’ कसा असू शकतो?’ असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते-खासदार अरविंद सावंत यांनी मिंधे गटावर केला.
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱयांना धारेवर धरले.
अरविंद सावंत म्हणाले, ‘आज देशात लोकशाही संस्थांची उघडपणे गळचेपी सुरू असून, संविधानिक संस्थांची स्वायत्तता संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संस्थेलाही सरकारच्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न होत आहे. न्यायव्यवस्था आणि निवडणूक यंत्रणा जर स्वतंत्र राहिल्या नाहीत, तर नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे जायचे?’ असा सवालही त्यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम मशीन जळाल्याच्या घटनेचा उल्लेख करत सावंत यांनी, ‘या घटनेमागील सत्य बाहेर येऊ नये म्हणून अनेक गोष्टी दडपल्या जात आहेत,’ असा आरोप केला. ईव्हीएमसंदर्भातील शंका दूर करणे हे सरकारचे कर्तव्य असून, लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास टिकवायचा असेल, तर या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल करताना खासदार अरविंद सावंत यांनी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागांचा वापर राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी होत असल्याचा आरोप केला. ‘विरोधी पक्षांतील नेत्यांवर छापे, चौकश्या आणि अटकसत्र सुरू होते. मात्र, तेच नेते भाजपमध्ये दाखल झाले की, त्यांच्यावरील सर्व कारवाया थांबतात,’ असे ते म्हणाले. ‘ज्यांच्यावर स्वतः पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांच्याविरोधात भाजपने आंदोलन केले, त्याच नेत्यांना नंतर पक्षात घेऊन मंत्रिपदे देण्यात आली. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील भाजपची भूमिका ही केवळ राजकीय सोयीसाठी आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
देशातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना सावंत यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकऱयांच्या आत्महत्या आणि शेतमालाला मिळणाऱया कमी भावाचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, अनेक ठिकाणी कांद्याला उत्पादन खर्चही मिळत नाही. युवकांना रोजगार मिळत नाही, उद्योगधंदे अडचणीत आहेत आणि सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे होरपळून निघत आहेत. मात्र, सरकार जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्याऐवजी विरोधकांना संपवण्याचे आणि सत्ता टिकवण्याचे राजकारण करण्यात गुंतले असल्याचा आरोपही त्यांनी केला.


























































