वेदान्तच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sangli-candle-march-for-vedant-bandgar-murder-case-demands-death-penalty-for-killers

‘कायदा आणि सुव्यवस्थेचा अंत…बळी गेला वेदान्त’ असे फलक घेऊन ‘कॅण्डल मार्च’ काढून सांगलीकरांनी वेदान्त बंडगर याला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ‘वेदान्तच्या मारेकऱयांना फाशी झालीच पाहिजे,’ अशी मागणी करण्यात आली.

वेदान्त बंडगर या निष्पाप मुलाचा मस्तवाल गुंडगिरीने बळी घेतल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि वेदान्तच्या कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी ‘कॅण्डल मार्च’चे आयोजन केले होते. विश्रामबागजवळील शहीद अशोक कामटे चौकापासून सायंकाळी ‘कॅण्डल मार्च’ निघाला. मोर्चा विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानासमोर आल्यानंतर येथे श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी ‘वेदान्तच्या मारेकऱयांना फाशी झालीच पाहिजे!’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘कॅण्डल मार्च’मध्ये वेदान्तचे वडील मारुती बंडगर, हमाल नेते बाळासाहेब बंडगर आणि बंडगर कुटुंबीय सहभागी झाले होते. यावेळी हमाल माथाडी महामंडळाचे छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस सुभाष लोमटे, बीडचे राजकुमार गायकवाड, प्रा. पद्माकर जगदाळे, तानाजी सावंत, ज्योती आदाटे, विकास मगदूम, सतीश साखळकर, पृथ्वीराज पवार आदींची भाषणे झाली.

सांगलीतील गुन्हेगारी मोडून काढा – आमदार गाडगीळ

‘सांगली शहर आणि जिह्यातील गुन्हेगारी मोडून काढा. नागरिकांना दिलासा द्या,’ अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज केली. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन त्यांनी सांगलीतील कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच ‘वेदान्त बंडगर याच्या हत्येबद्दल गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,’ असेही मत त्यांनी व्यक्त केले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.