
मुंबईसह राज्यात पाऊस लांबला असला तरी पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या लाटा आणि पूरपरिस्थितीत मदत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी (एसडीआरएफ) 28 कोटी रुपये खर्च करून 125 रोबोटिक वॉटर क्राफ्ट देण्यात येणार आहे.
पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना वाचविण्यासाठी रोबोटिक वॉटर क्राफ्ट अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता पावसाळ्यातील मदतकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रोबोटिक वॉटर क्राफ्टची मागणी करण्यात आली होती. हे वॉटर क्राफ्ट रिमोटद्वारे आपत्तीच्या ठिकाणी पोहोचवणे सहज शक्य होते.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांच्याकडून सरकारकडे 223 रिमोट कंट्रोल रोबोटिक वॉटर क्राफ्टची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 125 रोबोटिक वॉटर क्राफ्ट आपत्ती प्रतिसाद दलाला देण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे.
22 लाखांची एक बोट
या एका बोटीची किंमत 22 लाख 35 हजार रुपये असून ही संपूर्णतः भारतीय बनावटीची आहे. अशा 125 बोटी घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुमारे 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बोटीची क्षमता
- बॅटरीवर चालणारी ही बोट पाण्यातील 1 किलोमीटरपर्यंतचा पल्ला सहज गाठते. हिचा वेग ताशी 24 किमी असून दीड तास पूर्ण चार्ज केल्यानंतर 1 तासापर्यंत प्रवास करू शकते. 200 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असल्याने एका वेळी किमान 4 व्यक्तींना सोबत आणू शकते.
- बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जीवरक्षकाला स्वतः समुद्रात उतरावे लागत होते. अनेकदा, घाबरलेली बुडणारी व्यक्ती वाचवायला आलेल्या व्यक्तीला पकडते, ज्यामुळे वाचवणाऱ्याचा जीवही धोक्यात येतो आणि जीवितहानी वाढते. मात्र, या रोबोटिक वॉटर क्राफ्टमुळे वाचवणाऱ्या व्यक्तीला स्वतः पाण्यात न उतरता, रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत क्राफ्ट पाठवून तिला सुरक्षितपणे बाहेर काढता येते.


























































