Solapur News – पंढरपूरजवळ भीषण अपघात; पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, 7 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप गाडी रस्त्यालगत असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. ही घटना तांदुळवाडी (ता. माळशिरस) येथे रविवारी दुपारी घडली. अपघातग्रस्त सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी असून, ते म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात देवदर्शन करून गावी परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.

या अपघातात एकाच गावातील आणि एकाच कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. मृतांची नावे पूजा अमोल सातोरे, ताई बावचे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, सार्थक संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, गणेश बालाजी बावचे आणि समर्थ बालाजी बावचे अशी आहेत.

या अपघातात सिद्धेश्वर पोपट जाधव, अपूर्व अमोल सातोरे, शशिकला पोपट जाधव, बालाजी बावचे, सागर चौगुले (चालक), संदीप बावचे आणि आरव अमोल सातोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात होताच तांदुळवाडी येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कोणतीही पर्वा न करता विहिरीत उड्या मारून बचावकार्य सुरू केले. त्यांच्या धाडसामुळे सात जणांचे प्राण वाचले. काही मिनिटांचा उशीर झाला असता, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकअप गाडी विहिरीतून बाहेर काढण्यात आली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनातील प्रवाशांना स्वतःचा बचाव करण्यासही वेळ मिळाला नाही. विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली असल्याने अनेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पंढरपूर–म्हसवड मार्गावरील या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून, त्यानंतर वाहनांचा वेग वाढल्याने या मार्गावर अपघातांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. घटनास्थळी असलेल्या विहिरीभोवती कोणतीही संरक्षक भिंत किंवा दिशादर्शक फलक नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.